नेर ( विदर्भ प्रतिनिधी रजा शेख) पाश्चात्य संस्कृतीने सारा समाजच ढवळून निघालेला आहे. कृत्रिम आधुनिकतेच्या हव्यासापोटी व आपल्या पुढारलेपणाच्या बेगडी व तकलादू अनुकरणाने ,संपूर्ण समाजातच अनेकविध संस्कारांची भेसळ जाणवते. व्हॅलेंटाईन डे ,मदर डे, फादर डे अशा अनेक दिवसांनी तरुणाईवर गारुडं केलं आहे . आपल्या वाढदिवसाचा--- बर्थडे कधी झाला ?हा चंगळवादी संस्कार आपल्यावर मनावर व मेंदूवर स्वार झाला . याची उकल आपल्याला आता कधीच करता येणार नाही ,इतका तो आपल्या जगण्याचा व जिवनाचा भाग झाला आहे. पूर्वीच्या काळातील वाढदिवसाची संपूर्ण संकल्पनाच आता लयास गेली असून, आधुनिकतेच्या नावाखाली संपूर्ण समाजच पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार करायला लागला आहे. बर्थडे केक, कॅण्डल, सुरी ह्या सर्व नवीन संस्कारांनी आपल्या घराघरात शिरकाव केलेला आहे. जन्मदात्या आईने व घरातील जेष्ठ महिलावर्गांनी कधीकाळी केलेलं औक्षण केंव्हाच मागे पडलं आहे. आपल्या कपाळावर तिट लावून. ओवाळणी घालणारी सवाक्षिनी ?
आता केक वरचा क्रीम आपल्या तोंडाला फासून आपला चेहरा विदृप करण्यातच आनंद मानू लागली आहे. त्यात भरीस भर म्हणून होणारी फटाक्यांची आतीषबाजी व कर्णकर्कश संगीताच्या तालावर नाचणारी सर्व तरुणाई आपल्या समाजाला कुठे घेऊन जाणार ? या सर्व प्रकारांमध्ये आपल्या पारंपारिक संस्काराचा र्हास होतोच, त्यासोबतच पर्यावरणाची सुद्धा प्रचंड हानी होते. संपूर्ण जग विनाशाच्या मार्गावर वाटचाल करीत असताना, काही सजग जागरूक नागरिक आपली सामाजिक जबाबदारी ओळखून "पर्यावरण संवर्धन" करण्याच्या कार्यक्रमात अग्रक्रमाने आपल्या जबाबदारीचं भान ठेवतात. नेर येथील नव्या दमाचे पत्रकार दैनिक सिंहझेप प्रतिनिधी पियुष भोयर आणि संपूर्ण महाराष्ट्राला परीचीत असणारे, संवेदनशील व सृजनशील छायाचित्रकार महेंद्र गजभिये यांच्या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात वृक्षारोपण करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. समाजात सुरू असलेल्या या आधुनिक वाढदिवसाच्या संकल्पनेलाच फाटा देऊन पुन्हा आपल्या पुरातन संस्काराचं संवर्धन करण्यासाठी महेंद्र गजभिये,पियुष भोयर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय ठरला आहे. नेर शहरातील नव्या दमाचे आघाडीचे पत्रकार रजा शेख, वसीम मिर्झा, अंकुश रामटेके, तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रिया भोयर व नेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाषराव वाघमारे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम वनविभागाच्या परिसरात संपन्न करण्यात आला.