नेर तालुका प्रतिनिधी रजा शेख
नेर ( विशेष प्रतिनिधी) दुपारचं रणरणत ऊन ,तापणारी जमीन, उन्हाचा तडाका बसू नये म्हणून,अपूर्ण सावलीच्या आडोश्याच्या जागी उभी असलेली माणसे, डोळ्यात प्राण आणून समोरच दृश्य आपल्या हृदयात साठवीत होती .थोडसं "खट्ट" जरी झालं तरी ,सगळ्या गर्दीत घबराट पसरायची. आजूबाजूच्या परिसरात घोंगावणारा "ढोलचा" आवाज. आणि एक काठी घेऊन ,एका उंच दोरीवर तोल सावरुन चालणारी निरागस पोरगी .सारच दृश्य हृदय हेलावणारं आणि मन पिळवटणारं
हे दृश्य होतं ,नेर परसोपंत येथील टोलीपुरा परिसर, हनुमान मंदिराजवळचं डोंबारीच्या खेळाचे. सगळ्यात उपस्थितांनी ते अनुभवलं ,स्वातंत्र्याची 'अमृत महोत्सवी 'वाटचाल सुरू आहे. देश विश्वगुरू बनवण्याच्या वल्गना करणारी, स्वप्नाळू माणसे अवतीभवती वावरत आहेत .पण सामान्य माणसे तरी अगदी "डोळसपणे "या घटनांकडे पाहतील काय ?हा महत्त्वाचा प्रश्न आहे .देशात महागाई ,बेरोजगारी, गरीबी ,भूक मरी ,अधिका अधिक फोफावत असताना ,आम्ही मात्र विकासाची "केवळ स्वप्न "'उराशी किती दिवस साठवायचे ? ,सर्वांचा साथ सर्वांचा विकास, ही घोषणा केवळ कागदोपत्री चं रिंगण घालते की काय ?असा सवाल ह्या बेघर, लाचार, बेरोजगार व स्वतःचे रेशन कार्ड अथवा आधार कार्ड नसलेल्यांच्या मुखातून वारंवार विचारल्या जातो आहे
आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ ,एका भाकरीच्या तुकड्यासाठी दोरीवर. लोंब कडणारी ,ती निष्पाप पोरगी अनेक प्रश्न घेऊन उभे राहते .या बघ्यांच्या दुनियेत. आणि आपण मात्र केवळ "मनोरंजनाचा खेळ" समजून ,दानशूर कर्णाच्या आवेष्यात ,एक रुपया तिच्या फाटक्या पदरात टाकतो. आणि खूप काही केल्याचं, समाधान मिळवतो .खरं तर हा पराभव त्या कुटुंबाचा नाही. त्यांच्या गरिबीचा नाही .तर हा पराभव तुमच्या देशाचा ,तुमच्या समाजाचा आहे. तुमच्या बेजबाबदारपणाचा आहे संविधानाने या देशातील नागरिकाला समतेची वागणूक देण्याचं अभिवचन दिलं असताना, समाजातील एक घटक भाकरीसाठी दर दर भटकतो ही चूक कोणाची ?देश म्हणजे धर्म नव्हे तर ,देश म्हणजे देशातील माणसे ,याची जाणीव अधिकाधीक मजबूत व्हावी ,ही उद्याची गरज आहे.